गेल्या काही महिन्यात कस्टमर केअरच्या कॉलवरून फसवणूक होण्याचे प्रमाण वाढलेले आढळते. बँकेच्या कस्टमर केअरच्या नंबरप्रमाणे साधर्म्य असणाऱ्या नंबरचा वापर करून लोकांची फसवणूक करण्याचा नवा फंडा भुरट्यांनी सुरू केला. त्यामुळे लोकांनी आपल्या मोबाईलवर येणाऱ्या कस्टमर केअरचे फोन घेताना सावधगिरी बाळगावी.
बँकेचे कस्टमर केअरच्या नंबरसारख्या वाटणाऱ्या नंबर वरून लोकांना कॉल करून स्वतः बँकेचे अधिकारी सांगतात आणि त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती जाणून घेऊन लोकांची फसवणूक केली जाते. यासाठी एसबीआय बँकेने आपल्या ग्राहकांना सतर्क केले असून याबाबात ग्राहकांना मॅसेज आणि ईमेल केले आहेत. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आम्ही तुम्हाला एसबीआय कार्ड हेल्पलाईन नंबर 18601801290 किंवा 18001801290 या नंबरवरून कॉल करत नाही. अशा मिळत्याजुळत्या नंबर वरून येणाऱ्या कॉल बाबत ग्राहकांनी सावधान राहावे.
गुगल सर्चवरून कधीच कस्टमर केअर नंबर वापर करू नये
गुगल वरून कोणत्याही बँकेचे कस्टमर केअर नंबर शोधून त्याचा वापर करू नये. अशा सर्च वरून कस्टमर केअर कॉल केल्यास भुरटे त्याचा फायदा घेत लोकांकडून गुप्त माहिती जसे की कार्ड नंबर, एक्सपायरी डेट आणि सीवीवी नंबर मागून त्यांच्या खात्यातून पैसे काढतात. असे अनेक प्रकार अलीकडच्या काळात घडले आहेत.