मराठी चित्रपट धुराळा चित्रपटात दाखवल्याप्रमाणे एकाच घरातील सख्ख्या जावा नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीला उभ्या राहिल्या. एक भाजपकडून तर दुसरी शिवसेनाकडून निवडणूक लढवत होती. मात्र या निवडणूकीत विजय मात्र तिसऱ्याच व्यक्तीचा झाला.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ मध्ये राजश्री सतीश देशमुख आणि संगीता प्रमोद देशमुख या सख्ख्या जावा एकमेकांसमोर उभ्या होत्या. राजश्री यांनी शिवसेनेकडून तर संगीता यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. दोन्ही सख्ख्या जावा निवडणुकीत उतरल्याने घरातच रणधुमाळीचा माहोल तयार झाला. त्यामुळे या निवडणुकीत देशमुख घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली. दोन्ही घरचे निकालाची आतुरतेने वाट पाहत आहे. गावकऱ्यांचे ही नक्की कोणत्या जाऊबाई विजयाचा गुलाल उधळणार याकडे लक्ष लागले होते. म्हणतात ना दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ असाच प्रत्यय या निवडणुकीच्या निकालाच आला. दोघी जावा राहिल्या बाजुला आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या लता बोरस्ते जिंकून आल्या.
लता बोरस्ते यांना सर्वाधिक ३१२ मत मिळाली तर राजश्री देशमुख यांना ६२ आणि संगीता देशमुख यांना २३८ मत मिळाली. लता बोरस्ते यांचा विजयाने सर्व गावच अवाक झाले आणि दोघांच्या भांडण्यात तिसऱ्याचा लाभ अशी चर्चा गावात रंगली आहे.