कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेत नाशिकमध्ये चक्कर येऊन माणसं मृत्युमुखी पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशा अचानक गुढ पद्धतीने मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या वाढल्याने नाशिकच्या आरोग्य यंत्रणेत चिंतेचं वातावरण होतं. पण दरम्यान ऑक्सिजन गळतीची दुर्घटना घडली आणि त्यात हा गुढ मृत्युंचा विषय मागे पडला.
या बाबत संबंधित क्षेत्रातील काही डॉक्टरांशी आपला महाराष्ट्र प्रतिनिधीने चर्चा केली. नेमकं काय कारण असावं हे कुणालाच सांगता येत नव्हतं. काही जणांचं म्हणणं होतं की हा कोविड पश्चात परिणाम असावा. डॉ. अमोल अन्नदाते हे प्रथितयश डॉक्टर आहेत. त्यांनीही याबाबतीत शोध घेतला व ते म्हणाले की, हा एक्स्ट्रा पल्मिनरी कोविड या प्रकारातला आजार असावा. म्हणजे फुफ्फुसां व्यतिरिक्त इतर भागावर आक्रमण करणारा कोविड-१९ विषाणूचा आजार. या प्रकारात उलट्या व जुलाब मोठ्या प्रमाणावर होतात व वेगाने रुग्ण डिहायड्रेट होतो. त्यामुळे चक्कर येऊन पडतो.
नाशिक महानगरपालिकेतील संबंधित डॉक्टर म्हणाले की, अचानक वातावरणातला उष्मा वाढल्याने उष्माघाताचेही हे बळी असू शकतील.
सार्वजनिक आरोग्य सेवेतील एक डॉक्टर याबाबत म्हणाले की, या घटनेमागे हायपोक्सिया हा आजार असू शकतो. कोविड-१९ या विषाणूच्या नव्या स्ट्रेनमध्ये वेगाने मानवी फुफ्फुसाच्या आणि श्वासननिकेच्या तळाशी संसर्ग प्रस्थापित होत आहे. त्यामुळे श्वासाशी निगडित धोक्याची घंटा वाजण्याच्या आतच काही पेशंट चक्कर येऊन बेशुद्धावस्थेत जात दगावताना दिसत आहेत.
कोविड काळात हायपोक्सियातून वाचण्यासाठी आपली काळजी आपणच घ्यायला हवी. चक्कर येऊन बळी पडणारे कोविड संसर्ग असतानाही अजाणता हायपोक्सियाचे पेशंट असू शकतात.
त्यासाठी काय करायला हवं? सिक्स मिनिट वॉक टेस्ट करावी. तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन ही टेस्ट तुम्ही करू शकता किंवा तुमच्याकडे ऑक्सिमीटर असेल तर तुम्हीही करू शकता. ६० वर्षांच्या आतील व अस्थमा नसलेल्या पेशंटने आधी ऑक्सिमीटरने शरीरातील ऑक्सिजनची मात्र तपासावी. त्यानंतर सहा मिनिटांकरता झपझप चालून यावे. सहा मिनिटे चालून आल्यावर पुन्हा ऑक्सिजनची मात्र तपासावी. ऑक्सिजन जर तीन टक्क्यांनी घसरला किंवा ९३ च्या खाली आला तर पेशंटला हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची आवश्यकता आहे. तुमच्या डॉक्टरशी कन्सल्ट करून पुढची पावलं आखावीत. साठ वर्षांवरील व्यक्तींनी केवळ तीन मिनिटे चालावे.
होम क्वारंटाइन किंवा संशयित कोविड रुग्णांनी दिवसांतून दोनदा तरी ही टेस्ट करावी. त्यामुळे हायपोक्सिया होईपर्यंत वेळ येणार नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.