इ.स. १६४० ते १६४२ अशी दोन वर्षे बालशिवाजी वयाच्या बाराव्या वर्षी बंगळुरूच्या दरबारात बसून राज्य कारभार पाहत होते.
शिवाजी महाराजांनी या लहान वयात दोन वर्षे राज्य कारभार प्रत्यक्ष सहभाग घेऊन चालवला.
विजयनगरच्या जुन्या राज्यपद्धतीचे प्रशिक्षण त्यांना बंगळुरात मिळाले.
बालशिवाजींना महाराष्ट्रात पाठवताना शहाजी राजांनी सोबत शामराव नीलकंठ पेशवे म्हणून पाठवले. बाळकृष्णपंत नारोपंत हे मुजुमदार, सोनोपंत डबीर, रघुनाथ बल्लाळ हे सबनीस म्हणून सोबत दिले. या प्रधानांचा बंगळुरूच्या दरबारातला प्रशासकीय अनुभव दांडगा होता.
जिथं शिवाजी महाराजांनी राज्य कारभाराचे धडे गिरवले त्या बंगळुरातच महाराजांच्या पुतळ्याची विटंबना व्हावी हा दैवदुर्विलास आहे. पराक्रमी शहाजी राजे व त्यांचा महापराक्रमी मुलगा छत्रपती शिवाजी महाराज यांचं कर्नाटकशी असलेलं नातं हे असं आहे. या इतिहासाचं कन्नडिगांना विस्मरण होत असेल तर त्यांच्यासारखे मूढ जगात सापडणार नाहीत.
छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्या अधिपत्याखाली बंगळुरू हे शहर होतं आणि तिथे त्यांचा दरबार भरायचा हे कन्नडिगांना माहीत नसावं. शहाजी राजांनी केंप गौंडा नायकाचा पराभव करून बंगलोर जिंकले होते. तेव्हापासून बंगलोरचा कारभार शहाजी राजांकडेच होता.
विजयनगर साम्राज्य, इक्केरीचा वीरभद्र, कोंगूचा केंग नायक, कावेरीपट्टणचा जगदेवराय, तंजावरचा विजयराघव, जिंजीचा व्यंकट नायक, श्रीरंगपट्टणचा कंठिरव नरसराज ओडियार, मदुराईचा त्रिमल नायक या राजे व सरदारांचा पाडाव करण्यात शहाजी राजांनी पराक्रम गाजवला. पुणे, चाकण, वाई, मुधोळ, कऱ्हाड, तोरगलपासून ते कर्नाटकात विजयनगर, बंगळुरूपर्यंत त्यांच्या जहागिऱ्या होत्या. चिक्कनायकहळ्ली, बेल्लूर, टुककूर, कुल्लीहळ, बाळापूर हे प्रदेश शहाजी राजांकडे होते. कुतुबशहाचा सेनापती मीरजुमला याचा बंदोबस्त शहाजी राजांनी केला. शहाजीराजांनी वेलोर जिंकले आणि त्यांना त्याबद्दल ‘महाराज फर्जंद’ हा किताब मिळाला.
शहाजी राजांसोबत त्याकाळात अनेक मराठी कुटुंब कर्नाटकात रुजली. मराठी भाषा व संस्कृतीही रुजली. आज या इतिहासाचे कन्नडिगांना विस्मरण होत आहे. दख्खनवरचा भोसले राजवटींचा प्रत्यक्ष प्रभाव खूपच मोठा होता. त्यात राजकीय व ऐतिहासिक प्रभावासोबतच भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक व भाषिक प्रभावही खूप व्यापक आहे. त्या सगळ्याचं आकलन करून देण्याची गरज आहे.