एक खेड्यातील सामान्य माणूस नॉर्वेचे आधुनिक नाटककार हेन्रिक इब्सेन यांच्या साहित्यावरील प्रेमासाठी थेट नॉर्वे गाठून नॉर्वेजिअन भाषा शिकतो. इब्सेन यांची १२ नाटके मराठीत अनुवादित करुन मराठी साहित्याचे वैभव आणखी वाढवतो. असा अनोखा साहित्यप्रेमी म्हणजे डॉ. वसंत बागुल. त्यांचे नुकतेच निधन झाले. या निमित्ताने डॉ. वसंत बागुल यांच्या साहित्यातील कारकीर्दीचा घेतलेला हा वेध
केवळ इब्सेन यांच्या साहित्याचे भाषांतर करुन डॉ. बागुल थांबले नाही तर त्यांनी अमेरिकन आणि जपानी परीकथा ही मराठीत अनुवादित केल्या आहेत. त्यांचे साहित्यावरील प्रेम एवढे होते की, त्यांनी इब्सेन यांचे भाषांतरित इंग्रजी साहित्य रुचले नाही म्हणून त्यांनी नॉर्वेमध्ये जाऊन नॉर्वेजिअन भाषा अवगत केली. डॉ. बागुल यांचे मराठी साहित्यातील अनुवादक म्हणून योगदान महत्त्वाचे आहे.
डॉ. वसंत बागुल हे मालेगावच्या शाळेत शिक्षक होते. नोकरी करतानाच त्यांनी एमए केले. त्यांना वाचनाची व लेखनाची प्रचंड आवड होती. नाटकाकार हेन्रिक इब्सेन यांच्या साहित्याची गोडी डॉ. बागुल यांना लागली. इब्सेन यांच्या साहित्यावर त्यांचे प्रेम इतके जडले की, इब्सेन यांच्या मूळ भाषेतील (नॉर्वेजिअन ) साहित्याचा अभ्यास करण्यासाठी नॉर्वेला जाऊन भाषा शिकण्याचा निर्णय घेतला. नॉर्वे मिळेल ती नोकरी करुन त्यांनी नॉर्वे विद्यापीठात इब्सेन यांच्या नाटकावर पीएचडी केली. इब्सेन यांच्या १२ नाटकांचा त्यांनी मराठी अनुवाद केला आहे. डॉ. बागुल यांनी एवढ्यावरचं समाधान मानले नाही. त्यांना त्यांच्यातील जिज्ञासू स्वस्थ बसू देईना. नॉर्वेतून भारतात परतल्यावर त्यांनी जपानला जाण्याचे ठरवले. जपानी भाषा अवगत करून जपानी परिकथांचा अभ्यास केला. त्या परीकथा मराठीत अनुवादित केल्या. तेथे त्यांचे कुटुंब स्थायिक झाले. पण बागुल पुढे अमेरिकमध्ये गेले. अमेरिकेच्या सुदूर भागातील मॉटेलमध्ये वॉचमनचे काम करत तिथल्या मूळ परिकथांचा अभ्यास व अनुवाद केला. डॉ. बागुल यांनी आपली १९ पुस्तके ई-साहित्य माध्यमातून प्रकाशित करून वाचकांसाठी विनामूल्य उपलब्ध केली. बागुल यांचे साहित्य ई साहित्य प्रतिष्ठानने प्रकाशित केले आहे.
डॉ. वसंत बागुल यांची अनुवादित पुस्तके
हेन्रिक इन्सेन नाट्यमंत्र
हेन्रिक इन्सेन जीवन आणि नाटके
द लेडी फ्रॉम द सी
द मास्टर बिल्डर
अ डॉल हाऊस
द वाईल्ड डक
हेडा गॅब्लर
रोझमर्सहोल्म
मदिरालय – हरिवंशराय बच्चन
जपानी परीकथा – येइ ओझाकी
अमेरिकन परीकथा