
जुलै महिन्यात झालेल्या पासवाने राज्यातील अनेक भागांना झोडपले. कोकणातील रायगड जिल्ह्यात पोलादपूर येथील मौजे केवनाळे येथे दरड कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत साक्षी दाभेकर या तरुणीने आपल्या जीवाची पर्वा न आपल्या शेजारील घरातील तान्या बाळाचे प्राण वाचवले. बाळाचे प्राण वाचवण्यात साक्षीला यश मिळाले मात्र दुर्दैवाने या घटनेत तिच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे. तिच्या जिद्दीचे चौफेर कौतुक होत आहे. साक्षीला खेळाची खुप आवड आहे. मात्र काळाने ओढवलेल्या संकटामुळे तिने आपला पाय गमवला. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी या घटनेची दखल घेतली आहे. आपल्यावर ओढवलेल्या संकटाच्या दुखात जिद्दीने उभे राहण्यासाठी तटकरे यांनी साक्षीला अनोखं बळ दिलं आहे.
या आस्मानी संकटात अनेकांनी आपली घरं, परिवार, पशुधन गमावले. कोणी जबर जखमी झाले तर कोणी आपले अवयव गमावले. साक्षीने देखील आपला एक पाय यात गमावला. यात तिने खचून न जाता जिद्दीने उभे राहण्याची गरज आहे. यासाठी पालकमंत्री आदीती तटकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भुमिका साकारून जाणता राजाचे हुबेहूब दर्शन घडवणारे खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या सहकार्याने महाराजांच्या पेहरावातून साक्षीला आपल्या संकटातही खंबीर उभ राहण्याची ऊर्जा दिली आहे.
साक्षीवर सध्या मुंबई येथे उपचार सुरु आहेत. यासाठी तिला एक विरंगुळा म्हणून आदिती तटकरे यांनी स्मार्ट टॅब भेट दिला. त्यात अमोल कोल्हे यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील एक व्हिडीओ तयार करून पाठविण्यात आला आहे. याची माहीती आदीती तटकरे यांनी आपल्या सोशलमिडीयावर दिली आहे. तसेच साक्षीला पुन्हा तिच्या पायावर उभे राहण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली आहे.