इंडिया… इंडिया. आता कोरोनाकाळात हा आवाज आपण सारेच जण मिस करत आहोत. मात्र या निनादाने दशकांहून अधिक काळ शेकडोच्या स्टेडियम्स गाजवले आहेत. अजित वाडेकर, सुनिल गावस्कर, कपिल देव यांनी सत्तरच्या दशकात निर्माण केलेला स्टारडमचा वारसा मग पुढे सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांनी चालवला. विराटची बॅट सध्या थंडावली असली तरी तो लवकरच त्याच्या जुन्या अवतारात परतेल यात शंका नाही.
नेमकं रविवारी घडतयं तरी काय?
तर विषय असायं मंडळी की, भारताने एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वाधातच क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. १९३२ साली भारताने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले तर १९७४ साली एकदिवसीय सामन्यांमध्ये अर्थात वनडेमध्ये पदार्पण केले. १९७४ साली सुरु झालेल्या या वनडे क्रिकेटच्या प्रवासाचा, एक मैलाचा दगड या रविवारी पार केला जाणार आहे.
रविवारी दुपारी दीड वाजता भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्याचा टॉस उडवल्यानंतर क्रिकेटच्या इतिहासात १००० वनडे सामने खेळणारा पहिला क्रिकेट संघ म्हणून भारतीय संघाची नोंद होईल. भारताने आजवर ९९९ वनडे सामने खेळले असून त्यापैकी ५१८ सामन्यात विजय मिळवला आहे. भारताखालोखाल सर्वाधिक वनडे सामने खेळण्याच्या यादीत ऑस्ट्रेलियन संघ ९५८ सामन्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
भारताच्या टॉप सिक्स वनडे मॅच
६) भारत विरुद्ध इंग्लड, लीड्स मैदान, इंग्लंड
१३ जुलै १९७४
भारतीय संघाने खेळलेली पहिलीवहिली वनडे मॅच होती. सुनिल गावस्कर, गुंडाप्पा विश्वनाथ सारखे दिग्गज या संघामध्ये समाविष्ट होते. अजित वाडेकर या संघाचे कर्णधार होते. पहिली बॅटींग करताना भारतीय संघाने ५३.५ ओव्हर्समध्ये २६५ रन्स केल्या होत्या. (त्याकाळी एका डावात ६० ओव्हर्स खेळवल्या जायच्या.) दुसऱ्या डावात इंग्लंडने धमाकेदार सुरुवात केली होती. अखेर त्या सामन्याचा सामनावीर ठरलेल्या जॉन एड्रिकने कुटलेल्या ९० धावांच्या जोरावर इंग्लंडने हा सामना आरामात जिंकला होता.
५) भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका, ग्वालियर, भारत
२४ फेब्रुवारी २०१०
भारत आणि साऊथ आफ्रिकेदरम्यान तीन मॅचेसची मालिका सुरू होती. त्यातला दुसरा सामना हा ग्वालियर येथे खेळवला जात होता. भारताने पहिल्या डावाची सुरुवात केली. सेहवाग आणि सचिन मैदानात उतरले. भारताने समाधानकारक सुरुवात केली होती. पण जसजसा सामना पुढे गेला भारतीय बॅट्समननी तुफान फटकेबाजी चालू केली. कौतुकाची गोष्ट म्हणजे एकाबाजूने आपला सचिन भक्कम खिंड लढवत होता. साधारण ३० ओव्हर्स संपतानाच सचिनने आपले शतक पूर्ण केले. ४० ओव्हर्सच्या आसपास त्याने आपली १५० धावांची खेळी पूर्ण केली. साऱ्या प्रसारमाध्यमांतून बातम्याही सुरु झाल्या. मात्र शेवटच्या दहा ओव्हर्समध्ये सचिनची बॅट आणखी तळपली आणि ५० व्या ओव्हर्समध्ये त्याने २०० धावांचा टप्पा पार केला. क्रिकेटच्या इतिहासात वनडे सामन्यात द्विशतक झळकवणारा सचिन पहिला खेळाडू ठरला. सचिनच्या या खेळीवर भारताने ४०० धावांचा टप्पा पार केला. भारताने हा सामना एकतर्फी जिंकला होता.
४) भारत विरुद्ध इंग्लंड, लॉर्ड्स, इंग्लंड
(नेटवेस्ट सिरिज) १३ जुलै २००२
सदर नेटवेस्ट सिरिज खेळण्याआधी इंग्लंड संघ भारतात मालिका जिंकून गेला होता. त्यामुळे या नेटवेस्ट सिरिजमधून पराभवाचा वचपा काढायच्या अविर्भावातच भारतीय संघ ही मालिका खेळत होता. वानखेडेवर फ्लिंटॉफने टि-शर्ट काढून केलेले सेलिब्रेशन सर्वांच्याच ध्यानीमनी होतं. अंतिम सामन्यात इंग्लंड संघाने पहिल्या डावात ट्रेस्कोथिक आणि कर्णधार नासिर हुसैनच्या धमाकेदार शतकी खेळींवर ३२५ धावांची मजल मारली. दुसऱ्या डावात भारताची सुरूवात अत्यंत वाईट झाली होती. मात्र डावाच्या उत्तरार्धात मोहम्मद कैफच्या धमाकेदार ८७ धावांच्या जोरावर भारताने हा सामना अत्यंत चुरशीने जिंकला. सामना संपल्यावर दादाने (सौरव गांगुलीने) लॉर्डस् च्या बाल्कनीत टी-शर्ट काढून केलेले सेलिब्रेशन आजही भारतीय क्रिकेटमधली आयकॉनिक क्षण मानला जातो. काहीही म्हणा… पण दादाच्या या सेलिब्रेशनमुळे फ्लिंटॉफची पद्धतशीर जीरली असणार हे नक्की.
३) भारत विरूद्ध इंग्लंड, बर्मिंगहम, इंग्लंड
(चॅम्पियन्स ट्रॉफी) २३ जून २०१३
या वेळच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघाने पहिल्या सामन्यापासून वर्चस्व दाखवले होते. एकही सामना न हरता भारत संघ फायनलमध्ये पोहोचला होता. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना ५० ओव्हर्सवरून २० ओव्हर्सवर आणण्यात आला होता. पहिल्या डावात भारतीय संघाने २० ओव्हर्समध्ये १२९ धावा बनवल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंड संघाने सुरुवात खूप धमाकेदार केली होती. मात्र काही काळानंतर इंग्लंडच्या सातत्याने विकेटस् पडत गेल्या. इंग्लंडला शेवटच्या बॉलवर सहा धावांची गरज होती. जेम्स ट्रेडवेल स्ट्राईकवर होता आणि आपला आर अश्विन बॉल टाकणार होता. आर अश्विनने शॉर्ट लेंथवर टाकलेला बॉल काही अंशावर वळून, ट्रेडवेलला चुकवून, सरळ विकेटकीपर धोनीच्या हाती गेला आणि भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी उचलली.
२) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, लॉर्डस, इंग्लंड
(प्रुडेंशियल कप) २५ जून १९८३
आता या मॅचबद्दल काय वेगळं सांगाव… द ग्रेट कपिल देव, यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने त्यावेळच्या बलाढ्य समजल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला धूळ चारत, पहिल्यांदाच प्रुडेंशियल कप अर्थात वर्ल्डकप जिंकला होता. नुकतंच भारतीय सिनेमाच्या या कामगिरीवर एक बॉलिवूडपट सुद्धा येऊन गेलायं.