एकीकडे पेट्रोल-डिझेल ची दरवाढ सामान्य जनतेच्या खिश्यावर डल्ला मारत असताना दुसरीकडे लिंबाचेही भाव गगनाला भिडलेत. सध्या एक लिंबू घ्यायला किमान दहा रूपये हमखास मोजावे लागतात. त्यामुळे नागरिकसुद्धा त्रस्त आहेत की, घर नेमकं चालवायचं तरी कसं?
लिंबांच्या या दरवाढीमुळे आता त्यांची चोरी देखील व्हायला लागली आहे. उत्तर प्रदेशातल्या शाहजहांपूरच्या बाजारात चोरांनी तब्बल ६० किलो लिंबूची चोरी केली आहे. इतकेच नव्हे तर त्या चोरांनी लहसून, कांदा आणि वजन-काटा पण चोरुन नेला. सद्यस्थितीला तेथील व्यापाऱ्यांमध्ये या चोरीमुळे फार नाराजी आहे. परिसरामध्ये फक्त या चोरीचाच विषय चर्चीला जात आहे.
ही घटना तिलहर क्षेत्राच्या भाजीमार्केटमधली आहे. इथे राहणाऱ्या मनोज कश्यप नावाच्या व्यापाऱ्याच्या दुकानातून तब्बल ६० किलो लिंबू, ४० किलो कांदे आणि ३८ किलो लहसून चोरी केले गेले. चोरी झालेल्या लिंबांची किंमत जवळपास १२ हजार रुपये इतकी सांगितली जात आहे. या घटनेची अजूनही कोणत्याही प्रकारची पोलिस तक्रार करण्यात आलेली नाही. व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला.
देशभरात सध्या लिंबाची किंमत प्रतिकिलो ३०० रुपये इतकी झाली आहे. यामुळे नागरिकांमध्येसुद्धा चिंतेचे वातावरण आहे. प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न आहे की, इतक्या कडाक्याच्या गर्मीत लिंबांची किंमत इतकी का वाढली?