Home Uncategorized  महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील कासवांवर ‘सॅटेलाईट टॅगिंग’चा प्रयोग

 महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील कासवांवर ‘सॅटेलाईट टॅगिंग’चा प्रयोग

कासवांच्या स्थलांतराचा होणार अभ्यास

222
0

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासव मोठ्या प्रमाणात आढळतात. नोव्हेंबर ते मार्च हा या कासवांचा विणीचा हंगाम असतो. महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर प्रथमच कासवावर ‘सॅटेलाईट टॅगिंग’चा प्रयोग करण्यात आला. कासवावर ‘सॅटलाईट ट्रान्समीटर’ लावून कासवांच्या अधिवासाचा आणि स्थलांतराचा अभ्यास करण्यात येणार आहे. कोकणातील वेळास आणि आंजर्ले किनारपट्टीवरील दोन कासव मादीवर ‘सॅटेलाईट ट्रान्समीट’र बसवून त्यांना समुद्रात सोडण्यात आले.

हा प्रकल्प कांदळवन कक्ष, मँग्रोव्ह फाऊंडेशन आणि ‘भारतीय वन्यजीव संस्थान’मार्फत (डब्लूआयआय) राबविण्यात आला आहे. ट्रान्समीटर लावलेल्या वेळास येथील कासव मादीला ‘प्रथमा’ तर आंजर्ले येथील कासव मादीला ‘सावनी’ असे नाव देण्यात आले.

आतापर्यंत ऑलिव्ह रिडले कासवांचे टॅगिंग फक्त भारताच्या पूर्व किनाऱ्यावर करण्यात आले होते. आता महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर प्रथमच ऑलिव्ह रिडले कासवावर उपग्रहीय टॅगिंग करण्यात आले.

या प्रकल्पात ५ ऑलिव्ह रिडले कासवांना उपग्रह टॅग लावले जाणार आहेत. त्यातील दोघांना टॅग लावण्यात आले. कांदळवन कक्ष, मँग्रोव्ह फाऊंडेशन आणि ‘भारतीय वन्यजीव संस्थान’ तर्फे ऑलिव्ह रिडले कासवांच्या सागरी स्थलांतर मार्गाचे उपग्रहीय निरीक्षण करण्यात येईल. या प्रकल्पासाठी भारतीय वन्यजीव संस्थानने ९ लाख ८७ हजार अनुदान दिले आहे. या अभ्यासातून ऑलिव्ह रिडले कासवांच्या पश्चिम किनाऱ्यावरील सागरातील भ्रमणाबाबतची माहिती उपलब्ध होणार आहे. पुढे गुहागरमध्ये विणीच्या हंगामात फेब्रुवारी मध्ये तीन कासवांना ट्रान्समीटर लावण्यात येतील, अशी माहिती कांदवळ विभागाकडून देण्यात आली.

कसे होणार टॅगिंग
‘सॅटलाईट ट्रान्समीटर’ लावलेल्या मादी श्वास घेण्यासाठी समुद्राच्या पृष्ठभागावर आल्यानंतर ‘सॅटलाईट ट्रान्समीटर’ हे त्यांच्या स्थानांचे संकेत उपग्रहाला पाठवतील. त्यानंतर संशोधकांना त्यांच्या स्थानांची माहिती मिळेल.

Previous articleमुंबईत थंडीला ब्रेक; तापमान पूर्ववत
Next articleव्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीची पोलखोल, IAS राणी सोयमोईची कहाणीचा पर्दाफाश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here