आयपीएलच्या पंधराव्या हंगामासाठी काल व आज एकूण ५९० खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. प्रत्येक संघाला त्या आधी फक्त कमाल ४ खेळाडूंना रिटेन करण्याची मुभा होती. त्यामुळे नव्याने संघ तयार करण्यासाठी प्रत्येक संघाला खोऱ्याने पैसा ओतावा लागणार होता. अनेक दिग्गज व अनुभवी खेळांडूसोबतच युवा क्रिकेटर्सनाही कोटीच्या कोटी उड्डाणे घेता आली. भारतीय फलंदाज इशान किशन वर या हंगामातली सर्वाधिक बोली लावण्यात आली. त्याच्या पूर्वाश्रमीच्या मुंबई इंडियन्स याच संघाने त्याला १५.२५ कोटींना विकत घेतले.
या लिलावात काही मराठी क्रिकेटर्सनीही आपलं नाणं खणखणीत वाजवलं.
शार्दूल ठाकूर – १०.७५ कोटी, दिल्ली कॅपिटल्स
पालघरचा स्थायिक असलेल्या शार्दूलला दिल्ली कॅपिटल्स संघाने १०.७५ कोटींना विकत घेतले. याआधी शार्दूलने आयपीएलमध्ये सीएसके संघाचे प्रतिनिधीत्व केले असून भारतातर्फे तो आंतरराष्ट्रीय स्तरावरहील क्रिकेट खेळला आहे.
तुषार देशपांडे – २० लाख, चेन्नई सुपरकिंग्स
मुंबईचा रणजीपटू असलेल्या तुषारला चेन्नईने २० लाखांमध्ये खरेदी केले. गेल्यावर्षीच्या आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळलेल्या तुषारची यंदाची रणजी मोसमातली कामगिरी फारच कौतुकास्पद आहे.
अजिंक्य रहाणे – १ कोटी, कोलकाता नाईट रायडर्स
मुंबईच्या अजिंक्य रहाणेला कोलकाताने १ कोटींना विकत आहे. कसोटी संघातील आपलं स्थान डळमळीच झाल्यानंतर अजिंक्यला आगामी आयपीएलमधून आपलं कॅलिबर सिद्ध करुन दाखवावे लागणार आहे.
राजवर्धन हंगर्गेकर – १.५ कोटी, चेन्नई सुपरकिंग्स
मूळचा कोल्हापूरचा असलेल्या राजवर्धन हंगर्गेकरला धोनीच्या चेन्नई संघाने १.५ कोटीला विकत घेतले. सय्यद मुश्ताक अली आणि अंडर १९ मध्ये धमाकेदार कामगिरी केलेल्या या कोल्हापूरच्या सुपुत्रावर येत्या काळात सर्वांच्याच नजरा राहणार आहेत.
दर्शन नळकांडे – २० लाख, गुजरात टायटन्स
विदर्भाचा रणजीपटू दर्शन नळकांडे याला आयपीएलच्या नवख्या गुजरात टायटन्स या संघाने २० लाखांना खरेदी केले. गेल्यावर्षीपर्यंत पंजाब किंग्ससोबत नेट बॉलरची भूमिका पाडणारा दर्शन आता आयपीएलमध्ये प्रमुख संघासोबत खेळताना दिसणार आहे.
सुयश प्रभूदेसाई – ३० लाख, रॉयल चॅलेंजर बँगलोर
मूळचा महाराष्ट्राचा असलेला मात्र गोवा कडून रणजी सामने खेळणाऱ्या सुयशला कोहलीच्या आरसीबी संघाने ३० लाख रूपयांत खरेदी केले. सुयशने विजय हजारे ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये खोऱ्याने धावा केल्या आहेत.
अथर्व तायडे – २० लाख, पंजाब किंग्स
विदर्भाकडून रणजी सामने खेळणाऱ्या अथर्वला प्रिती झिंटाच्या पंजाबने संघाने त्याच्या बेस प्राईज म्हणजेच २० लाख रूपयात घेतले.
ऋतुराज गायकवाड – ६ कोटी, चेन्नई सुपरकिंग्स
महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला चेन्नईच्या संघाने लिलावाआधीच सहा कोटी रूपयात रिटेन केले आहे. गेल्यावर्षीच्या हंगामात ऋतुराजने एक शतकासहीत खोऱ्याने धावा करत चेन्नईला जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
एकीकडे महाराष्ट्रातील खेळाडूंना कोट्यवधींची बोली लागली मात्र काही मराठी खेळाडू हे या हंगामात अनसोल्ड राहिलेत.
अनसोल्ड राहिलेली मराठी पोरं-
यश ठाकूर
अपूर्व वानखेडे
अथर्व अंकोलेकर
अथर्व तायडे
धवल कुलकर्णी
केदार जाधव