वांगणी स्थानकात जिवाची पर्वा न करता रेल्वे रुळावर पडलेल्या सहा वर्षांच्या मुलाला शौर्याने वाचवणारे मयुर शेळके हे माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या नेरळनजीकच्या तळवडे गावाचे सुपुत्र आहेत.
पॉइंटमन असलेल्या मयुर यांचे रेल्वेने कौतुक करत त्यांना ५० हजार रुपयांचे इनाम जाहीर केले.
परंतु मयुर शेळके इतके उमद्या मनाचे की त्यांनी त्यातील अर्धी रक्कम म्हणजेच २५ हजार रुपये संगीता शिरसाट या अंध महिलेला व त्यांचा मुलगा साहिल शिरसाट यांच्यासाठी देण्याचे ठरवले आहे.
‘आपला महाराष्ट्र’शी बोलताना मयुर म्हणाले, अजून बक्षिसाची रक्कम माझ्या हाती आली नाही. पण जेव्हा येईल तेव्हा त्यातील २५ हजार रुपये अंध महिलेला देणार आहे. कारण त्यांच्याकडे उपजीविकेचे काही साधन नाही. खरंच मयुर शेळके यांच्यासारखे देवदूत आजही जगात आहेत ही दिलासादायक गोष्ट आहे.
वांगणी स्टेशनवर एक्स्प्रेस ट्रेन भरधाव वेगाने येत असताना एक लहान मुलगा अचानक ट्रॅकवर पडला आणि क्षणाचाही विलंब न लावता मयुर यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुळावर पडलेल्या चिमुकल्याचे प्राण वाचवले. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असताना दिसून येत आहे. रेल्वे मंत्रालयाकडून देखील मयुर यांच्या धाडसाची दखल घेण्यात आलेली आहे. त्यांना ५० हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही फोन करून मयुर यांच्या धाडसाचं कौतुक केले आहे. याशिवाय जावा मोटरसायकल कंपनीने त्यांना एक नवीन बाईक भेट देण्याची घोषणा केली. क्लासिक लीजेंड्सचे प्रमुख अनुपम थरेजा यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.