दिवाळी म्हटलं की, फराळ, रोषणाई, नवे कपडे, आणि यासोबतच असते स्थानिक मंडळांमध्ये किल्ले बनवण्याची धडपड. आजकाल दिवाळीत किल्ले तयार करण्याची परंपरा लोप पावते आहे. मात्र मुंबई शहराच्या भांडुप गावातील आझाद स्पोर्ट्स क्लबच्या तरुण मुलांनी या कलेचे जतन करत या वर्षीच्या दिवाळीला किल्ले पन्हाळ्याची प्रतिकृती साकारली आहे. किल्ल्याची प्रतिकृती साकार करण्याचे मंडळाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे स्वराज्यातील किल्ले हे राज्याची अलौकिक ठेवा आहे.
View this post on Instagram
आझाद स्पोर्ट्स क्लबने यावर्षी साकारलेल्या किल्ले पन्हाळा प्रतिकृती तयार करण्याचा प्रवास मंडळाचे कार्यकर्ते विराज म्हात्रे यांनी ‘आपला महाराष्ट्र’ला सांगितला. किल्ला तयार करण्याची सुरुवात दिवाळीच्या महिनाभर आधीपासून होते. यासाठी प्रत्यक्षात किल्ल्याला भेट देऊन मंडळाचे काही सदस्य किल्ल्याची रेकी करून येतात. किल्ल्यावरील तटबंदी, बुरूज, तळी, मंदिरे या साऱ्याचा बारकाईने विचार केला जातो. किल्ला तयार करण्यासाठी लागणारी जागाही ठरवली जाते. यंदाचा पन्हाळा किल्ला हा १० x १८ फुट इतक्या जागेत उभारण्यात आला आहे.
पुढे किल्ल्याच्या उभारणीची प्रक्रिया सुरू होते. मग लहान मुले विभागातून मोठे दगड, पेवर ब्लॉक, माती या गोष्टींचा साठा करण्याची सुरुवात करतात. सर्व प्राथमिक सामग्री गोळा झाल्यानंतर किल्ल्याची रचना डोळ्यापुढे ठेवून असलेल्या सामानातून किल्ल्याचा ढाचा तयार केला जातो. यावेळी रेकी करून आलेल्या टीमच्या मदतीने किल्ल्यावरील वास्तू तयार केल्या जातात. हे करताना प्रतिकृती ही साजेशी दिसण्यासाठी व त्यात जिवंतपणा येण्यासाठी तटबंदी, मंदिरे, बुरुज याला रंग देण्याचे काम केले जाते. हे करण्यासाठी लागणारी मेहनत सर्वजण मिळून करतात. सध्या महाराजांनी घडवलेले असंख्य किल्ले ही सुस्थितीत नसल्याने लोकांमध्ये या गोष्टींची जनजागृती करून स्वराज्यातील किल्ल्यांचे संवर्धन होणे जरुरीचे आहे. आपल्या संस्कृतीचा भाग म्हणून दिवाळीत किल्ल्यांची प्रतिकृती उभारण्याचा सामाजिक उपक्रम हाती घेतलेल्या आझाद स्पोर्ट्स क्लबची सर्वत्र मोठी चर्चा सुरू आहे.