महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट वाढत जात आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क वापरणे, सोशल डिस्टसिंग पाळणे आणि हात वारंवार धुणे असे उपाय आरोग्य विभाग आणि सरकारकडून सुचविले जात आहेत. मात्र सांगली जिल्ह्यातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे हे मास्क न वापरण्याचा सल्ला देत आहेत. नुकताच एक व्हिडिओ माध्यमात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना तोंडावरील मास्क काढायला भाग पाडत असल्याचे दिसत आहे.
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आळसंद या गावात एक भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. एका दुकानाचे उद्घाटन करण्यासाठी सर्व लोक जमले होते. मात्र रिबिन कापत असताना भिडे यांनी आमदार अनिल बाबर यांना तोंडावरील मास्क काढण्यास सांगितला. भिडेंचे ऐकून आमदारांनीही मास्क काढून टाकला. तसेच भिडे यांनी इतर उपस्थितांनाही मास्क काढून टाका असे सांगितले. या व्हिडिओमध्ये भिडे मास्क काढून टाकण्यास सांगत आहेत. कोरोना काही होत नाही, काढून टाका तो मास्क, असे ते लोकांना सांगताना दिसत आहेत