लहान मुलं आज सहजरित्या स्मार्ट फोन वापरतात. युट्यूबवर स्टंटबाजीचे व्हिडिओ पाहून त्याचे अनुकरण लहान मुले करायला बघतात. हेच अनुकरण मुलांच्या जीवावर बेतू शकते. आपली मुले इंटरनेटवर काय बघतात याकडे पालकांचे लक्ष नसते. फोन दिल्याने मुलं व्यस्त होतात आणि आपल्याला आपली काम करता येतात. ही आजच्या पालकांची मानसिकता झाली आहे. मात्र मुलं इंटरनेटवर स्टंटबाजीचे व्हिडिओ बघून तसे प्रत्यक्ष करण्याचे धाडस करतात. असाच दोन लहान मुलांचा टोलेजंग इमारतीवर स्टंट करतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. नेमकी हा व्हिडिओ कोणत्या शहरातील आहे याची माहिती उपलब्ध नाही. मात्र व्हिडिओमधील त्या दोन लहान मुलांचे कृत्य खूप धक्कादायक आहे. तसेच ते बघताना भीतीही वाटते.
टोलेजंग इमारतीच्या गच्चीवर दोन मुले वावरत आहेत. त्यातील एक मुलगा इमारतीच्या गच्चीवरील विंगमधल्या स्पेसमधील कठड्यावरून बिनधास्त इकडून तिकडून उड्या मारत आहे. चुकून जरी या मुलाचा तोल गेला असता, त्या मुलाचा जीव जाण्याची शक्यता होती. मुले अशा प्रकारची स्टंटबाजी इंटरनेटवर बघून करतात. पण याची कोणतीही कल्पना त्यांच्या पालकांना नसते. आपली मुले इंटरनेटवर काय बघत आहे, याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवे. मुलांना अशा स्टंट करण्यापासून रोखण्याची जबाबदारी पालकांची आहे. तरच हा जीवाशी खेळ थांबवता येईल. दुसरीकडे असे स्टंट लहान मुले करताना दिसत आहे, त्याचे चित्रीकरण करण्यापेक्षा तत्काळ ते करण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवे, हे प्रत्येक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य आहे.
काही वर्षापूर्वी दूरदर्शनवर शक्तिमान मालिका प्रदर्शित होयची. या मालिकेतील नायक शक्तिमान स्वतःभोवती गिरट्या घेऊन वरून उडी मारायचा. या मालिकेची प्रचंड क्रेझ लहान मुलांमध्ये होती. मुलं शक्तिमानचे अनुकरण करून गच्चीवरून उड्या मारायचे. ते त्यांच्या जीवावर बेतत होते. पालकांनी सावध राहून आपली मुले इंटरनेटवर नक्की काय बघत आहे, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर स्टंटबाजी व्हिडिओ बघत असतील त्याची योग्य वेळी दखल घेऊन आपल्या पाल्याला त्याबाबत जागरूक करून या गोष्टी प्रत्यक्षात करणे अयोग्य असून यामुळे जीवीतहानी होऊ शकते, याचे भान त्यांना करून द्यायला हवे.